पोलादपूरच्या विकासासाठी कटिबद्ध; सहाही उमेदवार विजयी होतील – आ. प्रवीण दरेकरांचा विश्वास

पोलादपूर | शैलेश पालकर 
गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक विधीमंडळ अधिवेशनामध्ये सातत्याने पोलादपूर तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडून अनेक विकासकामे मंजूर करून घेतली. वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा घेण्यासाठी अनेकदा मंत्री गोगावले यांनाही सांगितले आहे. मात्र, आ.प्रवीण दरेकर तालुक्याचा भूमिपुत्र असल्याने पोलादपूरचा मागासलेपणा दूर करण्याचा शब्द देतोय, म्हणून टीकेचे लक्ष्य करण्याचे ज्यांची राजकीय उंचीदेखील नाही; त्यांनी प्रयत्न करण्याचे काय कारण?असा सवाल करून कॅबिनेट दर्जाचे आ.प्रवीण दरेकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला.
पोलादपूर येथील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयामध्ये आ.प्रवीण दरेकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन लोहारे जि.प.गटाचे उमेदवार कृष्णा कदम, कोतवाल बुद्रुक पं.स.गटाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, महाडचे भाजपनेते बिपीनदादा म्हामूणकर, प्रसन्ना पालांडे, माजी उपाध्यक्ष मनोज भागवत, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, रिपाइं नेते सुदास मोरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल नलावडे तसेच अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आ.दरेकर यांनी, जी कामे मी मंजूर करून आणली त्यांचा नारळ कोणी फोडला, पाठपुरावा कोणी केला हा प्रश्नच असू शकत नाही. बाळंतपण मीच केले असे म्हणण्याचा तो हास्यास्पद प्रकार ठरेल असे सांगून ज्या कामांसाठी आग्रही होतो आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूरी दिली; त्यापैकी कुडपण पर्यंटन दर्जोन्नती, मिनी एमआयडीसी, क्रिडासंकुल, बुध्दविहार, चवदारतळे सत्याग्रहाचा वर्धापनदिन तसेच अन्य विकासकामांची पत्रं आ.दरेकर यांनी पत्रकारांसमोर ठेवली.
याप्रसंगी चंद्रकांत कळंबे यांनी केलेल्या आरोप व टीकांबद्दल आ.दरेकर यांनी वादविवाद टीका यापेक्षा पोलादपूरकरांना विकासात्मक विचार देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. इथे नसतानाही किती कोटींचा निधी दिला याची यादी देतो.पावणेदोनशे कोटींचा मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल कोणी मंजूर केले, महाडचे मच्छीमार्केट, पैठण ते कोतवाल रस्ता, चवदारतळयाचे सुशोभिकरण ही कामे कोणी केली. राजकीय इच्छाशक्ती असेल तर पोलादपूरला मिनी एमआयडीसी होऊ शकते, त्याला विरोधाला विरोध नको, अशी अपेक्षा व्यक्त करीत उमरठच्या सुशोभिकरणाचा विषय सभागृहात मांडून निधी मंजूर केल्यानंतर पाठपुरावा केला म्हणजे निधी मंजूर करणाऱ्याचे श्रेय तुम्हाला जात नाही, असे आ.दरेकर यांनी सुनावले. डुप्लीकेट बिलांसंदर्भात कारवाई होणार, असे ते ठामपणे म्हणाले.
माझा पत्रव्यवहार झाला की यांनी तो पाहून पाठपुरावा करून कामं आणतात आणि कोनशिलेवरील बजेट प्लेटही पुसून टाकतात. कोतवाल खुर्दमध्ये 1 कोटीच्या कामाबाबत तसे केलेले दिसून येईल,असे सांगून आ.दरेकर यांनी खोटे चित्र तोपर्यंत टिकते जोपर्यंत समोरची लोकं बोलत नाहीत. फलोत्पादन मंत्री असल्याने पर्यटन संचालकांकडे गेला तालुक्यात फळप्रक्रिया उद्योग आणण्याचा शब्द दिला. त्याबाबत काय झालं त्यांनी सांगावं असे आव्हान दिले. मंत्री नेते असल्यानंतर चंद्रकांत कळंबे यांनी ठेकेदारआधारित कामे मागण्यापलिकडे काय केले. माझ्या भागाचे मंत्री असल्याने भरतशेठच्या माध्यमातून विकास झाला तरी हवाय, असे सांगून उरण, अलिबाग, पनवेल, पेण, श्रीवर्धन, रोहे आणि महाड पोलादपूर येथील भाजप राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विजयी होतील आणि जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होईल, अशी भूमिका स्पष्ट केली.