पेरूच्या झाडाने वाचवले हजारो जीव; मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर प्रोपिलीन टँकर अपघात अनर्थ टळला

रायगड | अमुलकुमार जैन
मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ काही दिवसांपूर्वी घडलेल्या प्रोपिलीन टँकर अपघातामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. उलटलेल्या टँकरमधून प्रोपिलीन वायू गळती सुरू झाल्याने महामार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवावी लागली. पुढील तब्बल ३२ तास एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली, मात्र प्रशासन, आपत्कालीन पथके आणि तज्ञांच्या धाडसी प्रयत्नांमुळे संभाव्य मोठा स्फोट टळला.
अपघातग्रस्त टँकरमध्ये २२ टन प्रोपिलीन वायू होता. हा वायू उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहत असतो. बाहेर पडताच त्याचे तापमान –२० ते –२३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. त्यामुळे बर्फासारखी स्थिती निर्माण होते आणि त्वचेला स्पर्श झाल्यास गंभीर भाजल्यासारख्या जखमा होऊ शकतात. अपघातानंतर चालकाने गळती रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे दोन्ही हात भाजले गेले. जर हा ज्वलनशील वायू ठिणगी किंवा आगीच्या संपर्कात आला असता, तर सुमारे १० किलोमीटर परिसर धोक्यात येऊ शकला असता.
या गंभीर परिस्थितीत तज्ञांनी अत्यंत कल्पक उपाययोजना केली. पेरूच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेली खुट्टी गळतीच्या ठिकाणी बसवण्यात आली. हे लाकूड मऊ आणि लवचिक असल्याने अतिथंड तापमानात फुगून घट्ट बसते आणि वाईनच्या बाटलीवरील सीलप्रमाणे कार्य करते. या उपायामुळे गळती नियंत्रणात आली आणि टँकरमधील वायू सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात आला. संपूर्ण बचावकार्य सुमारे ३६ तास चालले.
अपघातस्थळाजवळ पेट्रोल कंपन्यांच्या गॅस लाईन्स असल्याने प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने उचलावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहतूक रोखण्यात आली होती. प्रवाशांना त्रास सहन करावा लागला, मात्र या दक्षतेमुळे हजारो जीव सुरक्षित राहिले.
‘३२ तासांची वाहतूक कोंडी’ ही केवळ ट्रॅफिकची घटना नव्हती; ती धैर्य, तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनशीलतेची विजयकथा ठरली. पेरूच्या झाडाची साधी खुट्टी हजारो प्रवाशांच्या जीवितरक्षणाची साक्षीदार ठरली.