पेण शहराला जोडणाऱ्या भोगावती नदीवरील पुलावर आज झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. रस्त्यावरील खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलावरून जात असताना रिक्षा चालकाने रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने वाहन डाव्या बाजूला घेतले, मात्र त्या ठिकाणी कोणताही संरक्षक कठडा नसल्याने रिक्षा थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत एकनाथ किंजवडे (वय 53, रा. कामार्ली, ता. पेण) यांना तातडीने पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अपघातात भूषण पाटील (रा. कराडे, पो. रसायनी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या पुलावर मोठा खड्डा पडलेला असल्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असल्याचे समजते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.