पेण पूर्व भागातील ग्रामीण आणि आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना पोलिसांशी संबंधित कामांसाठी आता पेण शहरात जाण्याची गरज कमी होणार आहे. वरसई येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दूरक्षेत्र पोलीस चौकीचे उद्घाटन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते करण्यात आले. या चौकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांना तातडीने पोलीस मदत मिळण्यास हातभार लागणार आहे.
दरम्यान, वरसई दूरक्षेत्र पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रात जवळपास ४० गावे आणि ४३ आदिवासी वाड्यांचा समावेश आहे. यापूर्वी या भागातील नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी किंवा पोलिसांशी संबंधित कामांसाठी पेण शहरातील पोलीस ठाण्यात जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि पैशांचा खर्च होत होता. ही गैरसोय दूर करण्यासाठी वरसई येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली असून, ही चौकी २४ तास जनतेच्या सेवेत कार्यरत राहणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांनी सांगितले. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी या चौकीच्या उभारणीसाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे मेहनत घेतल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.
या उद्घाटन सोहळ्याला वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, दादर सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे, पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्लेकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, ताई जोमा दरवडा, आदिवासी समाजाचे अध्यक्ष जोमा दरवडा, वाकरूळचे सरपंच गणेश गायकर, वरसईच्या सरपंच वैशाली जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत होजगे, माजी पंचायत समिती सदस्य नीलकंठ दिवेकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरसईतील ही चौकी पेण पूर्व भागातील ग्रामीण आणि आदिवासी जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.