तिसरी महामुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील उरण, पेण व पनवेल तालुक्यातील सुमारे ९५ गावांतील जमिनींवर सध्या बाहेरील लोकांनी डोळा ठेवला आहे. ‘एक गुंठा – एक प्लॉट’ अशा जाहिरातींना भुलून परराज्यातील व काही बांगलादेशी नागरिकांनी उरण पूर्व विभागात मोठ्या प्रमाणावर जमिनींचे व्यवहार सुरू केले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी मागवलेल्या माहितीनुसार, खरेदी झालेल्या दस्त नोंदणीमध्ये राजस्थानातील वाळवंट भागातील भूमी प्रमाणपत्र एडिट करून खोटे शेतकरी दाखले जोडून नोंदी करण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. याकडे महसूल विभागही कानाडोळा करत असल्याची चर्चा आहे. नोंदणीसाठी तलाठी व सर्कल रसद घेत असल्याच्या चर्चाही जनतेमध्ये आहेत. सामान्य नागरिकांना जमिनीसाठी शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक असताना परराज्यातील लोकांना एवढी मेहरबानी का, असा सवालही मनसेने उपस्थित केला आहे.
मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या शिष्टमंडळाने दुय्यम निबंधकांशी भेट घेऊन मिळवलेल्या दस्तऐवजांमधील खोटे दाखले समोरासमोर दाखवून दिले. जमिनींच्या खरेदी-विक्री संदर्भातील चुकीच्या गोष्टी तातडीने थांबवाव्यात, अन्यथा हायकोर्टात जनहित याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा सत्यवान भगत यांनी प्रशासनाला दिला आहे.