पेण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस शिगेला पोहोचलीअसून उमेदवार प्रचारात गती आणत आहेत. मात्र प्रचारासोबतच एकमेकांवर चिखलफेकही तितक्याच जोमात सुरू आहे. आतापर्यंत पेण नगरपालिकेत एकूण 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणुक अधिक रंगतदार झाली आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांकडून विकासकामांतील विसंगती, PMAY घरांचा विलंब, पाणीपुरवठा योजनेतील कोट्यवधींचे बदलते आकडे, अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आणि नागरी समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. विकास आराखड्यातील बदलांमुळे गार्डनच्या जागी कमर्शियल कॉम्प्लेक्स, रस्ता कामांतील कोट्यवधींचा कथित घोटाळा, PMAY लाभार्थ्यांना सहा वर्षे घरे न मिळणे आणि पाणीपुरवठा योजनेतील 165–170 कोटींच्या बदलत्या आकड्यावर त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “उत्तर द्या, मगच मत मागा”, अशी भूमिका घेत नंदा म्हात्रे यांनी 26 नोव्हेंबरला देवा भाऊ पेणमध्ये येण्यापूर्वी सर्व मुद्द्यांची लिखित उत्तरे देण्याची मागणी केली.
शहरातील अर्बन बँक ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा, फिल्टरेशन प्लांटची अनिश्चितता, धोकादायक ब्रिज, प्रलंबित उड्डाणपूल, बससाठी जागेचा अभाव, रिक्षाचालकांच्या स्थलांतरातील गोंधळ, भाजी मंडईतील अस्वच्छता आणि गैरव्यवस्थापन या सर्व मुद्द्यांचा पत्रकार परिषदेत उल्लेख झाला. विशेष म्हणजे, नगरपालिकेचा आराखडा मागितल्यावर “कागद आगीत जळाले” असे उत्तर मिळाल्याचा आरोप करून नंदा म्हात्रे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली.
यावेळी या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा रायगडच्या प्रभारी राणी अगरवाल, पेण विधानसभा निरीक्षक मनोज कांबळे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्रुती म्हात्रे, ओबीसी विभाग काँग्रेस कोकण विभाग शंभू म्हात्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, संदीप पाटील तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.