रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सांक्षी किल्ल्याजवळ असलेल्या कावजीची वाडी येथे ६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळून गावातील अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांचे व शेतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक कुटुंबांसमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना कावजीची वाडीवर मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेत राम कावजी वीर, मदन अंबाजी वीर, आंब्या अंबाजी वीर, महादू राम वीर, धावू राया वीर, कमलाकर खाकर, धावू पोश्या वीर, नारायण वीर आणि बाळू वीर या आदिवासी बांधवांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काहींची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तसेच गुलाब वाघमारे आणि अविनाश वाघमारे यांच्या घरांचेही अंशतः नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
दरड कोसळल्यामुळे परिसरातील भात, नाचणी आणि वरीची शेती मोठ्या प्रमाणात मातीखाली गाडली गेली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने या कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधनच हिरावले गेले असून पुढील काळात त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत अनेक पाळीव प्राण्यांसह अंदाजे ४० ते ५० कोंबड्यांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. बाधित कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत, सुरक्षित निवारा आणि पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरपायथ्यावरील वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरजही या घटनेनिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.