पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात चारचाकी वाहनांसाठी MH06CU या नवीन नोंदणी मालिकेला सुरुवात झाली आहे. आकर्षक व पसंतीचे क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून चारचाकी खासगी वाहनांसाठी नियमित शुल्क तर दुचाकी व चारचाकी परिवहन वाहनांसाठी विहित शुल्काच्या तीनपट शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची पहिली मुदत ८ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
अर्जदारांनी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत खाजगी वाहन विभागात डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डाच्या साक्षांकित प्रतींसह अर्ज जमा करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी त्याच दिवशी दुपारी ४ वाजता नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी लिलावासाठी किमान ५०१ रुपयांचा अतिरिक्त डीडी सीलबंद पाकिटात जमा करावा लागणार आहे. लिलावाची प्रक्रिया दुपारी ४ वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दालनात होणार आहे.
चारचाकी वाहनांसाठी राखीव क्रमांक वगळता इतर आकर्षक क्रमांक दुचाकी व जड वाहनांसाठी ९ सप्टेंबरपासून उपलब्ध राहतील. यासाठीचा लिलाव १० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. राखून ठेवलेला क्रमांक बदलता येणार नाही तसेच १८० दिवसांत नोंदणी न झाल्यास तो आपोआप रद्द होईल. आगाऊ अर्जांसाठी दिलेल्या पावत्या जुन्या मालिकेतील क्रमांक संपल्याशिवाय वापरण्यात येतील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी स्पष्ट केले आहे.