पेण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत शितोळे आदिवासीवाडी, हमरापुर फाटा परिसरातील टेकडीवरील झाडीझुडपात 35 वर्षीय महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची ओळख आंबी जान्या जाधव (वय 35, रा. भोंगुली, महलमिऱ्या डोंगर, ता. पेण) अशी पटली आहे. ती काही दिवसांपूर्वी स्वतःहून पती व आई-वडिलांपासून दूर पेण येथे वास्तव्यास आली होती. सोमवारी (8 जून) तिचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गालगतच्या झाडीझुडपात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी महिलेच्या भावाने पेण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणातून महिलेच्या तोंडावर धारदार हत्याराने वार करून तिचा खून केला असावा. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत झाडीझुडपात टाकून आरोपी फरार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पेण पोलिसांनी या घटनेचा गुन्हा नोंदवून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ पथक आणि श्वानपथकाच्या मदतीने परिसराची तपासणी करण्यात येत असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पेण पोलिस करत आहेत.