रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून कर्जत–पेण मार्गावरील सारसई येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील आठ प्रवाशांची रसायनी पोलिसांनी धाडसी बचावमोहीम राबवत सुखरूप सुटका केली. या बचावकार्यात हेल्प फाउंडेशन, रसायनीच्या स्वयंसेवकांनीही मोलाचे सहकार्य केले.
सारसई परिसरात पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एसटी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रसायनी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हेल्प फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व आठ प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविले.
या बचावकार्यातील सर्वाधिक भावनिक क्षण म्हणजे ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला प्रवाशाला चालणे शक्य नसल्याचे लक्षात येताच एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या संवेदनशील आणि धाडसी कृतीमुळे उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
रसायनी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून प्रवाशांनीही बचाव पथकाचे आभार मानले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांकडून विविध ठिकाणी सतत गस्त, मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात पूरग्रस्त रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आणि पोलीस व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.