पुणे येथील हगवणे प्रकरणानंतर सुनेच्या छळाचे प्रकरण रायगडमध्ये; मुरुडमध्ये पती-सासरच्यांविरुद्ध गुन्हा

Murud police thane
रायगड | अमुलकुमार जैन
पुणे येथील गाजलेल्या हगवणे प्रकरणानंतर राज्यात सुनेच्या छळाच्या घटना विविध ठिकाणी समोर येत असताना रायगड जिल्ह्यातील मुरुड येथेही अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेवर पती व सासरच्या मंडळींकडून गेल्या सात वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने अखेर पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शितल भिमराव पाडवी (वय ४१, रा. मसाल गल्ली, मुरुड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतरपासून पती भिमराव रेज्या पाडवी (वय ४२), सासू जयवंती रेज्या पाडवी, सासरे रेज्या जेटया पाडवी व चंद्रकला रेज्या पाडवी (सर्व रा. उमेश अपार्टमेंट, बी विंग, रूम नं. ६, पांडुरंग पावशे नगर, काठे मानावली, कल्याण पूर्व, जि. ठाणे) यांनी संशय घेऊन तसेच पैशांसाठी वारंवार छळ केला. कर्ज फेडण्यासाठी पैशांची मागणी करत न दिल्यास मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
तसेच लग्नावेळी माहेरहून मिळालेले सोन्याचे दागिने सासरच्यांनी ठेवून घेतल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे. गेल्या सात वर्षांपासून पतीने पत्नी व मुलांची जबाबदारी नाकारल्याने ती त्रस्त झाली होती. अखेर अलिबाग येथील ‘भरोसा सेल’मार्फत अर्ज केल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली. या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५३/२०२६ भा.न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ८५, ११४(२), ३५२ तसेच ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस हवालदार सोळसे तपास करत आहेत. राज्यभरात अशा घटना समोर येत असताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.