जम्मू आणि काश्मीरमधील २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करत असून, प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, ISI (Inter-Services Intelligence) आणि लष्कर-ए-तोयबा (LeT) या दहशतवादी संघटनेचा थेट संबंध या हल्ल्याशी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नागरिकांचा बळी गेलेल्या या हल्ल्याचा कट LeT च्या पाकिस्तानातील मुख्यालयात रचण्यात आला होता. ISI चे वरिष्ठ अधिकारी या कटामागे सक्रिय होते. दोन मुख्य दहशतवादी – हाश्मी मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई, हे दोघेही पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकशीत समोर आले आहे की, हे दहशतवादी भारतात काही आठवड्यांपूर्वीच घुसले होते आणि त्यांना OGW (Over Ground Workers) च्या नेटवर्ककडून मदत मिळाली होती. स्थानिक पातळीवर राहण्याची सोय, मार्गदर्शन, रस्त्यांची माहिती, टेहळणीसाठी मदत यामध्ये OGWs ची भूमिका होती.
NIA ने गोळा केलेला फॉरेन्सिक आणि इलेक्ट्रॉनिक पुरावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. घटनास्थळावरून ४० कार्टेजेस जप्त करण्यात आले असून, त्या बॅलेस्टिक आणि केमिकल अॅनालिसिससाठी पाठवण्यात आल्या आहेत. ३D मॅपिंग करून तपास अधिक काटेकोर करण्यात येत आहे. याशिवाय, जवळच्या मोबाईल टॉवर्सचा डम्प डेटा देखील तपासला जात आहे.