पनवेल महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील यांनी पदभार स्वीकारताच कामकाजाला वेग दिला. मुख्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर तातडीची आढावा बैठक घेऊन प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले. पाणीपुरवठा, शिक्षण, मालमत्ता कर व अतिक्रमण या प्रमुख विषयांवर पहिल्याच दिवशी लक्ष केंद्रीत करण्यात आले. या सोहळ्यास ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पाणीटंचाईचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला. खारघर, कामोठे, कळंबोली, तळोजा तसेच ग्रामीण भागात जाणवणाऱ्या पाण्याच्या कमतरतेवर तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जलप्राधिकरण, सिडको आणि शिलार प्रकल्पाशी समन्वय साधत भविष्यातील वाढती मागणी लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. शिक्षण क्षेत्रात कामोठे व तळोजा येथे नवीन शाळा उभारण्याबरोबरच खारघर, कळंबोली, ग्रामीण भाग आणि नवीन पनवेल येथे चार नवीन शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
अतिक्रमणाच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले. आठवडा बाजारांवरील अनधिकृत अतिक्रमणावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिक्रमण विभागात मनुष्यबळ वाढविणे, आवश्यक वाहने उपलब्ध करून देणे आणि नोडनिहाय बैठका घेऊन नियोजनबद्ध मोहिमा राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. नव्या नेतृत्वाने प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय अधिक बळकट करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.