पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. या समस्येवर उपाय म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याचे काम केले. या उपक्रमामुळे पळस्पे फाटा, राहूल हॉटेल परिसर तसेच मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने प्रवाशांना सोयीस्कर मार्गक्रमण करता येऊ लागले आहे.
या तत्पर कार्याबद्दल चाकरमान्यांनी आणि स्थानिकांनी पनवेल पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांकडून केलेला हा वेगळा उपक्रम सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.