पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा; १३ जण अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

 

पनवेल | संजय कदम 
पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत १३ आरोपींना अटक केली आहे. वाकडी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे २ लाख ७१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून भारतात प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सट्टेबाजीस प्रवृत्त केले. यासाठी विविध व्यक्तींच्या बँक खात्यांची माहिती, पासबुक, एटीएम कार्ड, मोबाईल क्रमांक तसेच इतर कागदपत्रांचा वापर करण्यात येत होता. आरोपी ‘लोटस 365’ या अॅप अथवा लिंकच्या माध्यमातून क्रिकेटसह विविध खेळांवर ऑनलाईन सट्टा खेळण्याची सुविधा पुरवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १७ मोबाईल फोन, ६ लॅपटॉप, ४ लॅपटॉप चार्जर, ४ एक्स्टेन्शन बोर्ड, १० मोबाईल चार्जर, एक वाय-फाय राऊटर, विविध बँक पासबुक, चेकबुक, क्रेडिट व डेबिट कार्ड, सिमकार्ड, पासपोर्ट तसेच व्यवहारांची नोंद असलेल्या डायऱ्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ७१ हजार ६३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ३(५), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ मधील कलम ४ व ५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ४३, ६६ आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दिपाली पाटील (सायबर सेल), सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुरुद्ध गिजे तसेच पनवेल शहर व पनवेल तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. या रॅकेटमागील आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.