पनवेलमध्ये सणासुदीच्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना; फुलविक्रेते आणि वाहनचालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था!

पनवेल | संजय कदम 
 गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात फुले खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्नाळा सर्कल आणि उरण नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकेरी वाहतूक, फुलविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपाययोजना राबविण्यात आली. पनवेल शहर पोलीस ठाणे, पनवेल महानगरपालिका, महापौर नितीन जी. पाटील, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार यांच्याशी चर्चा करून तसेच संबंधित परिसराची पाहणी करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक परिस्थितीचा विचार करून आवश्यक ठिकाणी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली. भाऊराव पाटील चौक ते कर्नाळा भाजी मार्केट परिसरात फुलविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली, तर दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. रस्त्यांवरील अडथळे कमी करून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला.
वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, निर्धारित पार्किंगच्या जागेचाच वापर करावा आणि रस्त्यावर वाहने उभी करून किंवा व्यवसायासाठी जागा अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना राबविण्यावरही भर देण्यात आला.
या नियोजनामुळे गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यास आणि नागरिकांची गैरसोय कमी करण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.