बैलगाडीपासून आमदारकीपर्यंतचा प्रवास; महेंद्र दळवींनी दसऱ्याला जपल्या जुन्या आठवणी!

Mahendra Dalvi cherished old memories this Dussehra
अलिबाग | अमुलकुमार जैन 
 कधीकाळी बैलगाडीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे आणि आज दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार महेंद्र दळवी यांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. चोंढी ते भालनाका असा बैलगाडी हाकत त्यांनी प्रवास केला. त्यांच्या या उपक्रमातून शेतकरी जीवनाशी असलेले नाते आणि ग्रामीण संस्कृतीबद्दलची आपुलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
राजकारणात येण्यापूर्वी महेंद्र दळवी यांनी शेतकरी म्हणून काम केले असून, बैलगाडीशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी आजही कायम आहेत. आमदार म्हणून मोठी जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या जुन्या जीवनशैलीचा विसर पडू दिलेला नाही. दरवर्षी दसऱ्याच्या निमित्ताने बैलगाडी हाकत ते आपल्या पूर्वीच्या दिवसांना उजाळा देतात. यंदाही त्यांनी शेतकऱ्यांसोबत बैलगाडी चालवत चोंढी ते भालनाका असा प्रवास केला.
दसरा हा विजय, परंपरा आणि नव्या संकल्पांचा सण मानला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि वाहनपूजन केले जाते. मात्र, आमदार दळवींनी बैलगाडी हाकत ग्रामीण जीवनाशी असलेले नाते जपण्याचा प्रयत्न केला. आधुनिक वाहनांच्या युगात बैलगाडीचे महत्त्व कमी झाले असले, तरी शेती आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये तिचे स्थान आजही महत्त्वाचे आहे.
बैलगाडीपासून सुरू झालेला प्रवास विधानसभेपर्यंत पोहोचला असला, तरी आपल्या मातीशी असलेली नाळ कायम असल्याचा संदेश महेंद्र दळवी यांनी या उपक्रमातून दिला. त्यांच्या या कृतीमुळे पारंपरिक ग्रामीण जीवनशैली, शेतकरी संस्कृती आणि जुन्या आठवणींचा जागर दसऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाला.