खालापूरमधील वादानंतर आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांचे संयुक्त वक्तव्य; स्थानिकांच्या हितासाठी एकत्रित काम करण्याची भूमिका

Joint statement by MLA Mahendra Thorve and Sudhakar Ghare
कर्जत | गणेश पवार
खालापूर तालुक्यातील सावरोली येथील L&T कंपनीतील रोजगाराच्या मुद्द्यावरून आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या समर्थकांमध्ये वाद आणि धक्काबुक्की झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वक्तव्य करत खालापूरमधील कंपन्या आणि कर्जतमधील प्रकल्पांबाबत स्थानिकांचे हित लक्षात घेऊन सहमतीने वाटचाल करण्याची भूमिका स्पष्ट केली.
सावरोली येथील L&T कंपनीतील रोजगाराच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. याचवेळी आमदार महेंद्र थोरवे यांचे बंधू विश्वनाथ थोरवे तेथे आले. कंपनीतील कामकाज आणि रोजगाराच्या विषयावर चर्चा सुरू असताना थोरवे यांनी आक्षेप घेतल्याने वातावरण तापल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर आमदार थोरवे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. यावेळी कोल्हापूरचे डीवायएसपी डॉ. विशाल नेहूल आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रायनवार उपस्थित होते.
घटनेची माहिती पसरताच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसील कार्यालयाच्या दिशेने धावल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना खालापूर पोलीस ठाण्यात बोलावून समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या वादानंतर आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी संयुक्त वक्तव्य केले. खालापूरमधील कंपन्या आणि कर्जतमधील प्रकल्पांच्या संदर्भात स्थानिकांचे हित महत्त्वाचे असून, त्यासाठी सहमतीने पुढील वाटचाल केली जाईल, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली. वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी एकत्रित भूमिका जाहीर केल्याने या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.