पनवेलमधील कापड बाजार परिसरात भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

पनवेलमधील कापड बाजार परिसरातील भीषण आग प्रसंगावधानामुळे टळली;
पनवेल | प्रतिनिधी 
पनवेलमधील दाटीवाटीच्या कापड बाजार परिसरात जैन मंदिरासमोर असलेल्या ‘जलाराम सावित्री’ इमारतीच्या मीटर रूमला पहाटे चारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. वायरिंगच्या माध्यमातून ही आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, जागरूक शिवसैनिक ॲड. स्वप्निल उपाध्ये यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
आग लागल्यानंतर ॲड. उपाध्ये यांनी पालिकेच्या वेबसाईटवर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवर नमूद केलेल्या ०२२-२७४६१५०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ शिवसेना महानगरप्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्याशी संपर्क साधला. ॲड. सोमण यांनी नवीन पनवेल सिडको फायर डिपार्टमेंटमार्फत पनवेल अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने गाड्या घटनास्थळी पाठवल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
या घटनेनंतर ॲड. प्रथमेश सोमण यांनी सकाळीच फायर ब्रिगेड स्टेशनला भेट देत प्रशासनाला धारेवर धरले. दोन दिवसांत अधिकृत क्रमांक सुरू करण्याच्या सूचना देतानाच तोपर्यंत अग्निशमन प्रमुखांचा थेट संपर्क क्रमांक गाड्यांवर लावण्याचे आदेश दिले. शिवसेनेच्या वतीने अवघ्या तासाभरात नवीन क्रमांकाचे स्टिकर्स तयार करून गाड्यांवर लावण्यात आले. यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, अर्जुन परदेशी, मंदार काणे आणि गुलाब बागवान उपस्थित होते. शिवसैनिकांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.