पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; माणगाव न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

रायगड | अमुलकुमार जैन
पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारल्याच्या प्रकरणात माणगाव येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी दिपक अशोक झांजे (वय ३६) याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेप व चार हजार रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढालकाठी (ता. महाड) येथे घडली होती. कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी निशा दिपक झांजे (वय २८) यांच्या अंगावर प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल ओतून माचिसच्या साहाय्याने आग लावल्याचा आरोप होता. सुरुवातीला या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गंभीर भाजलेल्या अवस्थेत निशा झांजे यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान ६ जानेवारी २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी दिलेल्या जबाबात पतीनेच पेट्रोल ओतून आग लावल्याचे स्पष्ट नमूद केले होते. त्यानंतर तपासात अन्य साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी केला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अति सरकारी वकील जितेंद्र डी. म्हात्रे यांनी एकूण १५ साक्षीदार तपासले. यात वैद्यकीय अधिकारी, मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे कार्यकारी दंडाधिकारी, घरमालक आणि शेजाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
उपलब्ध पुरावे, मृत्यूपूर्व जबाब आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल कौटुंबिक हिंसाचाराच्या गंभीर घटनांमध्ये महत्त्वपूर्ण मानला जात आहे.