अलिबाग तालुक्यातील नागाव गावात बिबट्याचा अचानक शिरकाव झाला असून पाच जणांवर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने नागावमधील सर्व शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण घटनेला अलिबाग फॉरेस्टचे अधिकारी भोईर यांनीही दुजोरा दिला आहे.”
नागाव परिसर आज बिबट्याच्या दहशतीने हादरला आहे. दुपारी अंदाजे दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान हा बिबट्या गावातील वाड्यांमध्ये मुक्तपणे फिरताना आढळला आणि अचानकपणे पाच जणांवर हल्ला चढवला.” हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि भाऊसाहेब जवरे यांचा समावेश असून, सर्वांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”
“नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी पालकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की,”विद्यार्थी सुरक्षित आहेत. शाळा तात्पुरत्या बंद आहेत पण मुलांची सुरक्षा पूर्ण लक्षात घेतली आहे. नागरिकांनी बाहेर फिरणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.”
“बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ दाखल झाली. अलिबाग फॉरेस्टमधील अधिकारी भोईर यांनी या घटनांना दुजोरा देत सांगितले आहे की बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
“नागावमध्ये सध्या भीतीचं वातावरण असलं तरी प्रशासन, वनविभाग आणि पोलिस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना विनंती आहे की शांत राहावे, सावधगिरी बाळगावी आणि कुठलाही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच कळवावी.”