अलिबाग तालुक्यातील भाकरवाड परिसरात दिवसा घरफोडी करून मोबाईल व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला पोयनाड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक करत तत्परतेचे उदाहरण दाखवले आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोयनाड पोलीस ठाण्यात १९ एप्रिल रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी कुंदनकुमार सिंग व इतर चार जण भाकरवाड येथील चाळीत वास्तव्यास आहेत. १८ एप्रिल रोजी सकाळी ते कामानिमित्त घराबाहेर गेले असताना अज्ञात व्यक्तीने घराची स्लायडिंग खिडकी उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ५ मोबाईल फोन व ३ हजार रुपये रोख असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
गुन्हा दाखल होताच पोयनाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक माहिती आणि स्थानिक माहितीच्या आधारे अनिल किसन राठोड (वय २४, रा. शास्त्री नगर, अलिबाग) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपी यापूर्वीही गुन्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोयनाड पोलीस करत आहेत.