अलिबाग-पेण मार्गावरील धरमतर पुलाजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या भीषण रिक्षा अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चालकासह एक जण जखमी झाला आहे. दारूच्या नशेत रिक्षा चालविताना चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-पेण रोडवरील धरमतर ब्रिजजवळ जेएसडब्ल्यू कंपनीच्या कन्व्हेयर बेल्टखाली हा अपघात घडला. ऑटो रिक्षा चालक कृष्णा जगन्नाथ घरत (वय ४०, रा. खरोशी, ता. पेण) याने दारूच्या नशेत असताना रिक्षा क्रमांक एमएच-०६ बीव्ही-६०१० चालविताना वाहनाचे हँडल सोडल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षामधील संतोष किसन घरत (वय ४७, रा. खरोशी) यांचा मृत्यू झाला.
या घटनेत फिर्यादी गजानन वसंत माळी (वय ४१) तसेच चालक कृष्णा घरत हे जखमी झाले असून त्यांच्यावर वडखळ येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गजानन माळी यांच्या फिर्यादीवरून चालक कृष्णा घरत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो जखमी असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे करीत आहेत.