दापोलीत पुन्हा पोक्सोचा गुन्हा; अल्पवयीन गर्भवती, जुलैतील चौथी धक्कादायक घटना

पेण तालुक्यातील बावीस वर्षीय पठ्ठ्याच्या अत्याचारातून अलिबागची अल्पवयीन मुलगी गर्भवती
दापोली | प्रतिनिधी 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पुन्हा एकदा पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीला मातृत्व प्राप्त झाल्याची बाब समोर आल्याने जुलै महिन्यातील हा चौथा पोक्सो गुन्हा ठरला असून, तालुक्यात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दापोली तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांची मालिका सुरू असून, चार दिवसांत तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर १० जुलै रोजी आणखी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. या प्रकरणात अल्पवयीन पीडितेला मातृत्व प्राप्त झाल्याची गंभीर बाब उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, याच दिवशी निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून दापोलीतील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देत पोक्सो गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याचा अधिक प्रभावी धाक निर्माण करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. दोषींना तातडीने अटक करून जलदगती न्यायालयातून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.