दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उरणमध्ये लोकनेते दि. बा. पाटील शैक्षणिक संकुलाची उभारणी सुरू !

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उरणमध्ये लोकनेते दि. बा. पाटील शैक्षणिक संकुलाची उभारणी सुरू !
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शैक्षणिक संस्थेच्या प्रश्नाला आता गती मिळाली आहे. स्थानिकांच्या दीर्घकालीन संघर्षानंतर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या शैक्षणिक संकुलाच्या कामाची सुरुवात दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक विजय व राजेंद्र शिरढोणकर बंधू यांना विकासक म्हणून संकुल उभारणीचे काम संस्थेने मंजूर केल्याने उरणकरांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे.
या संकुलासाठी २००७ साली स्थापन झालेल्या उरण तालुका प्रकल्पग्रस्त शैक्षणिक व सामाजिक संस्थाने समाजातील सर्व स्तरातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून मोठे प्रयत्न केले. माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विश्वस्त मंडळाने आधुनिक सुविधा असलेली भव्य इमारत उभारण्याचा निर्धार केला होता. अखेर शिरढोणकर बंधूंचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याने हे स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली.
यावेळी झालेल्या भूमिपूजन समारंभात लोकनेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करत “दि. बा. पाटील अमर रहे” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले. संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, संघटक संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते. भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परगावी जावे लागणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास शिरढोणकर बंधूंनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *