पावसाळ्यात अतिवृष्टी आणि दरडी कोसळल्यामुळे महिनाभर वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागलेल्या ताम्हिणी घाटातील धोकादायक मार्गाला पर्याय म्हणून दहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या कामासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा परिषदेतील पक्षप्रतोद अमित नाईक उपस्थित होते.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा रायगड जिल्ह्यातील घाट मार्गांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रस्ते बाधित झाले. पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटातील राष्ट्रीय महामार्गावरही दरडी कोसळल्याने वाहतूक जवळपास महिनाभर ठप्प होती. याचा परिणाम स्थानिक नागरिकांसह रायगडच्या पर्यटन व्यवसायावरही झाला. ताम्हिणी घाटातील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन धोकादायक भाग वगळून दहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. बोगदा झाल्यास पावसाळ्यातील वाहतुकीतील अडथळे कमी होण्याबरोबरच प्रवासाचा वेळही वाचणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात महारेल अंतर्गत कर्जत येथे तीन आणि नागोठणे येथे एक अशा चार रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे साडेचारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, ही कामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड येथील पथकर नाक्याला स्थगिती मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली.