ठाण्यात देहव्यवसायाच्या जाळ्यावर पोलिसांचा छापा; अभिनेत्रीला अटक, दोन अभिनेत्रींची सुटका

ठाण्यात देहव्यवसायाच्या जाळ्यावर पोलिसांचा छापा
रायगड  | अमुलकुमार जैन 
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील श्रीनगर पोलीस ठाणे परिसरात अनैतिक मानवी वाहतूक शाखेने (AHTC) कारवाई करत एका महिला अभिनेत्रीला अटक केली असून, देहव्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. या तिघीही हिंदी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वागळे इस्टेट परिसरातील साई टच हॉटेलजवळ एका अभिनेत्रीमार्फत ग्राहकांना देहव्यवसायासाठी महिला पुरविल्या जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक आणि पंचाच्या मदतीने सापळा रचून कारवाई केली. यावेळी एका महिलेला ताब्यात घेत दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला अभिनेत्री हिंदी तसेच भोजपुरी मालिका, चित्रपट, वेबसीरिज, व्हिडीओ गाणे आणि मॉडेलिंगमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना देहव्यवसायासाठी पुरवत असल्याचा आरोप आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणातील अभिनेत्री आणि सुटका करण्यात आलेल्या महिलांनी ‘द अनवांटेड गिफ्ट’, ‘जिला ग्रिडी’, ‘बंद दरवाजा’, ‘तू देख मेरी फोटो’, ‘बिजली’, ‘नौकर नंबर १’, ‘घुंघट’, ‘दो दिन का मेहमान’, ‘छू ले जरा’, ‘सावधान इंडिया’, ‘सौदा’, ‘पिनी लस्सी’, ‘टाइम पास’, ‘तलब’ आणि ‘पहरेदार अगेन’ यांसह विविध मालिका, चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अटक केलेल्या महिलेचे आणखी कोणते साथीदार या प्रकारात सहभागी आहेत, तसेच यापूर्वी आणखी किती महिलांना ग्राहकांकडे पाठविण्यात आले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच संबंधित अभिनेत्रींच्या कामाच्या पार्श्वभूमीचीही पडताळणी केली जात आहे.
अटक करण्यात आलेल्या महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत विविध कलमांनुसार कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन महिलांना सुरक्षित महिला सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे डीसीपी अमर सिंह जाधव, एसीपी मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजली आंधळे, एपीआय स्नेहल शिंदे, पीएसआय दीक्षा ढाकरे तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.