ज्येष्ठ नागरिकांना फसवणाऱ्या दागिने चोर टोळीचा पर्दाफाश

रायगड | अमुलकुमार जैन 
नवी मुंबईतील रबाळे परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून, या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रबाळेगावातील अनुसया दत्ता शिंदे (वय ५९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी कामावरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना गाठले. “शेठला मुलगा झाला असून साडी वाटप सुरू आहे,” अशी खोटी माहिती देत त्यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान अशोक विठ्ठल काळे, विष्णू शिवाजी पवार आणि लखन उर्फ कार्तिक काळे (सर्व रा. कोपरखैरणे) यांना अटक करण्यात आली. चौकशीत या टोळीने नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि गुजरातमध्येही अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दिपक खरात आणि त्यांच्या पथकाची महत्त्वाची भूमिका होती. पोलिसांकडून आरोपींच्या इतर गुन्ह्यांचा तपास सुरू असून, नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.