रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रोहा, तळा, महाड, पोलादपूर, माणगाव, पाली आदी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना १५ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, हा आदेश सकाळी ९.४८ वाजता प्रसिद्ध झाल्याने अनेक विद्यार्थी आधीच शाळा-महाविद्यालयात पोहोचले होते.
या उशिराने आलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. भर पावसात अनेक विद्यार्थी शिक्षणसंस्थांमध्ये पोहोचले होते आणि नंतर त्यांना परतावे लागले. अनेक पालकांनी प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली असून, हवामान इशाऱ्यावर तत्काळ निर्णय घेणे गरजेचे होते, असे सांगितले.
दरम्यान, सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात प्रशासनाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.