कर्जत तालुक्यातील मौजे वडवली तर्फे वरेडी येथील एका वृद्ध आईसह तिच्या चार विवाहित मुलींनी आम्हाला चुलत भावाच्या हिस्स्याची जमीन विकून त्याच्या उपचारासाठी मदत करण्याचे कारण देत दलालांनी आमच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत संपूर्ण जमीनच परस्पर विकून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली असून नेरळ पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील महसूल विभागांतर्गत नेरळ मंडळ अधिकारी व तलाठी सज्जा माणगाव हद्दीतील मौजे वडवली तर्फे वरेडी येथील सर्व्हे क्रमांक २२/२, १९/२ क, २२/१अ, २२/१ड, ३१/१, ३२/९, ५२/२, ५३/२, ५४/४ ब आणि ६४/२ या जमिनी लक्ष्मण पोसू मराडे यांच्या नावावर होत्या. सन २००६ मध्ये त्यांनी आपल्या पाच मुलींना वारस म्हणून मृत्युपत्र करून जमीन त्यांच्या नावावर केली होती. त्यानंतर लक्ष्मण मराडे यांचे निधन झाले आणि मुली विवाहानंतर आपल्या संसारात व्यस्त झाल्या.
दरम्यान, मराडे कुटुंबातील चुलत भाऊ आजारी असून त्याच्या उपचारासाठी त्याच्या हिस्स्याची जमीन विकण्याची गरज असल्याचे सांगत संबंधित दलालांनी मुलींना संपर्क साधला. मानवी दृष्टिकोनातून मदत करण्याच्या हेतूने मुलींनी सहमती दर्शवली. मात्र, या व्यवहारात संपूर्ण जमीनच परस्पर विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित जमीन अशोक रोहिला यांच्याशी व्यवहार करून विकण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मुंबईतील धनाढ्य मालकांकडून या जागेवर काम सुरू झाल्यानंतर मराडे कुटुंबाला हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ कामाला विरोध करत ते बंद पाडले. मात्र जमीन विक्रीची माहिती मिळताच आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने वृद्ध शारदाबाई लक्ष्मण मराडे तसेच त्यांच्या मुली वंदना भोईर, आशा इरमाळी, गुलाब शिंगटे, रेणुका शिंगटे आणि हिरा इरमाळी यांनी न्यायालयात धाव घेतली असून नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात स्थानिक मध्यस्थ व दलालांसह कर्जतमधील काही प्रसिद्ध नावांचा देखील उल्लेख करण्यात आल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यात जमीन फसवणुकीची ही एकमेव घटना नसून यापूर्वीही अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मोठे आर्थिक हितसंबंध, राजकीय हस्तक्षेप आणि बलाढ्य बिल्डर यामुळे सामान्य व अशिक्षित शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
————————————
आमच्या चुलत भावाच्या आजाराचे व त्याच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशाच्या मदतीसाठीचे कारण संबंधीत दलालांनी पुढे करत, त्याच्या हिस्स्याची जागा विकण्याच्या गल घालुन आमच्या भावनाचा व अशिक्षित पणाचा फायदा घेत चुलत भावासह आमच्या हक्काची असलेली सर्व जमीन ही दलालांनी परस्पर दुसऱ्याला विकून आमची घोर फसवणूक केली आहे. तर अमच्याशी एक ही रुपयाचा व्यवहार झाला नसल्याचा आमचा दावा आहे.
…वंदना हरिश्चंद्र भोईर व इतर चार, पिडित वृध्द आई व मुली.