छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत – शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत - शिवसेना खासदारांकडून पंतप्रधानांचे आभार
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. खासदार बारणे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे राज्याच्या गौरवशाली इतिहासाबरोबरच पर्यटन, रोजगार व सांस्कृतिक ओळख मजबूत होणार आहे.
या वेळी केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव, शिवसेनेचे गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यशील माने, रविंद्र वायकर, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा उपस्थित होते. खासदारांनी पगडी व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन पंतप्रधानांचा सन्मान केला. शिवाजी महाराज हे भारताचे महान रणनीतिकार आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांच्या लष्करी रणनीतीत किल्ल्यांना विशेष स्थान होते. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी हे किल्ले त्यांचे सामर्थ्य व लष्करी स्थापत्यकलेचे प्रतीक आहेत.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील समृद्ध वारसा जागतिक नकाशावर अधिक ठळक होईल. यामुळे राज्यातील लोकांचा अभिमान वाढेल, तर शैक्षणिक व सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळेल. किल्ल्यांच्या संवर्धन व देखभालीला नवा वेग मिळणार असून आंतरराष्ट्रीय पर्यटकांची मोठी आकर्षण स्थळे बनतील. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटनाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *