संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे १२ दुर्ग आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या विशेष मान्यतेसह हे किल्ले आता जागतिक स्तरावर ओळखले जाणार आहेत. या यादीत रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
या ऐतिहासिक घटनेच्या औचित्याने रायगड किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवराजांना अभिवादन करण्यात आले. राजसदरपासून लेझीम पथक व पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ येथे जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपतींच्या समाधीस्थळी अभिवादन करत पोलीस मानवंदना देण्यात आली. संपूर्ण गडावर आकर्षक रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.
या अभिमानास्पद प्रसंगी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, DYSP महाड, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.