छत्रपतींच्या रायगडावर अंधाराचे साम्राज्य! दीपोत्सवाच्या निमित्ताने उजळलेल्या रायगडावर पुरातत्त्व विभागाचे काळे सावट

छत्रपतींच्या रायगडावर अंधाराचे साम्राज्य
महाड | मिलिंद माने 
राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत राजकारणाची सुरुवात करतात, पण छत्रपतींच्या राजधानी रायगड किल्ल्यावर मात्र अंधाराचे साम्राज्य कायम आहे. दीपोत्सवाच्या सोहळ्यात झगमगत्या प्रकाशात झळाळणारा रायगड काही वेळानंतर पुन्हा काळोखात बुडतोय, आणि शिवभक्त मात्र दिवाळी ‘काळोखात’ साजरी करत आहेत.
“शिवचैतन्य सोहळा” या भावनेतून शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने किल्ले रायगडावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. “पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी” या भावपूर्ण संकल्पनेतून सजलेल्या या दीपोत्सवात रायगडाच्या प्रत्येक दगडावर आणि कड्यावर तेजाचे वातावरण निर्माण झाले. राज्यभरातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी वाजतगाजत आणण्यात आली आणि पूजाविधीने सोहळ्याची सांगता झाली.
मात्र या भव्य दीपोत्सवानंतर पुन्हा एकदा रायगड किल्ल्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले. सौरऊर्जेवरील दिवे बसवूनही ते प्रकाशित होत नाहीत. राजसदरा, होळीची माळ, शिरकाई देवी मंदिर परिसर आणि पायरी मार्गावर अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळते. उन्हाळ्याच्या वातावरणात सूर्यप्रकाश मुबलक असतानाही सौर दिवे न पेटल्याने त्यांच्या निकृष्ट दर्जाची चर्चा सुरू आहे. शिवभक्तांच्या म्हणण्यानुसार, पुरातत्त्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे रायगड अंधारात बुडालाय.
रायगड जिल्हा परिषदेने बसवलेले सौर दिवे केंद्रीय पुरातत्त्व विभागाने जाणीवपूर्वक काढून टाकल्याचा गंभीर आरोप कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीला अंधारात ढकलणे म्हणजे इतिहासाचा अपमान आहे.” तातडीने सौर दिवे बसवले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी छत्रपतींच्या नावाने राजकारण करत असताना त्यांच्या राजधानीकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र भावना शिवभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. मंत्र्यांची दालने उजळत असताना छत्रपतींचा रायगड अंधारात बुडालेला पाहून शिवभक्त संतप्त आहेत. “राज्यकर्त्यांनी रायगडाच्या उजेडासाठी पुढाकार घ्यावा” अशी सर्वसामान्यांची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *