PEN : खुशबू मृत्यू प्रकरण ! 6 महिने उलटूनही न्याय नाही, लेखी हमीमुळे ठिय्या आंदोलन 15 ऑगस्टपर्यंत स्थगित

खुशबू मृत्यू प्रकरण : 6 महिने उलटूनही न्याय नाही, लेखी हमीमुळे ठिय्या आंदोलन 15 ऑगस्टपर्यंत स्थगित
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रमशाळेत चौथीत शिकणारी खुशबू ठाकरे हिचा मृत्यू चुकीच्या वैद्यकीय उपचारांमुळे २२ जानेवारी २०२५ रोजी झाला. सहा महिने उलटून गेले तरी दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने ठिय्या आंदोलन सुरू केले. तहसीलदारांच्या लेखी हमीमुळे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
१६ डिसेंबर २०२४ रोजी खुशबूच्या अंगावर दिसलेल्या चट्ट्यांवरून कुष्ठरोगाचा संशय घेतला गेला. मात्र कोणताही ठोस निदान न करता तिच्यावर थेट कुष्ठरोगावरील उपचार सुरू करण्यात आले. यामुळे तिची प्रकृती ढासळली व २२ जानेवारी रोजी एमजीएम रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. चौकशी समितीचा अहवाल २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांऐवजी थेट राज्य शासनाकडे दिला गेला, यावरून प्रकरण दडपण्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
या आंदोलनात खुशबूचे पालक, ग्रामस्थ व अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी १५ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे
प्रमुख मागण्या:
  1. खुशबूच्या मृत्यूचा चौकशी अहवाल पोलिसांना सादर करून तो सार्वजनिक करावा.
  2. केमिकल अ‍ॅनालिसिस रिपोर्ट सार्वजनिक करावा.
  3. दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात सादर करावे.
  4. जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती विखे यांचा जबाब ग्राह्य धरू नये.
  5. जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांना पदावरून मुक्त करावे.
  6. पालकांना 10 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *