गणेशोत्सवाच्या पाच दिवसांच्या काळात पोलादपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांसह गणेशभक्तांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे दिसून आले. उत्तर वाहिनी सावित्री नदीच्या घाटावर विसर्जन काळात कंत्राटी कामगार निर्माल्य संकलनासाठी सर्वत्र तत्पर असल्याचे दिसत होते.
गणेशोत्सव हा शहरातील सर्वाधिक गर्दीचा ठरत असताना मुख्य रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट सुरू ठेवणे, बंद दिव्यांची तातडीने दुरुस्ती करणे आणि पेस्ट कंट्रोल करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही कामे नगरपंचायतीकडून अपेक्षित असताना पाच दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान काही मुख्य रस्ते अंधारवाटा झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होऊ लागली. अनेक महिने नगरपंचायतीकडून स्ट्रीट लाईटचे विद्युत देयकापोटीची रक्कम जमा केली नसल्याने शहरातील प्रमुख रस्ते अंधारात ठेवले होते. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन काळोखात झाले; त्यावेळी काळोखात विसर्जन करणाऱ्या कुटुंबांना दाद न देणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन काळोखात होऊ नये याची दक्षता घेण्याची अपेक्षा होती. मात्र, रस्ते काळोखात ठेवून नगरपंचायत प्रशासनाने श्रीदेवी गंगामाता घाट, पिंपळपारालगतचा घाट, गणेश मंदिरासमोरील घाट, सातीआसरालगतचा घाट येथे याठिकाणी तात्पुरती प्रकाशझोताची योजना करण्यात आली.
पोलादपूर शहरातील साफसफाई व शहर स्वच्छता खासगी ठेकेदार करीत असताना दीड दिवसांच्या गणपतींचे आणि पाच दिवसांच्या गौरी गणपती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी कंत्राटी कामगारांना नियुक्त करण्यात आले. सावित्री आणि चोळई नदीच्या संगमावर सावित्री नदीमध्ये थेट कचरा सोडणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने निर्माल्य नदीत जाण्याआधीच गोळा करून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाप्पाच्या शिदोरीच्या प्लास्टिक पिशव्या आधीपासूनच सावित्री नदीच्या पात्रात तरंगत असल्याचे पाहण्यास मिळाले. हरित लवादाने नोटीस बजावल्याने नगरपंचायतीकडून निर्माल्य नदीत जाण्याआधीच गोळा करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा आर्थिक भार टाकण्यात आला असताना पोलादपूर शहरातील स्ट्रीट लाईट बंद ठेवण्यासोबत निर्माल्य संकलनासाठीचा केविलवाणा प्रयत्न सर्वच नगरसेवकांनी दूर्लक्षित केला आहे.