रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे बिनविरोध निवड झाली. मात्र, येत्या 7 एप्रिलला नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप होणार असताना चंद्रकांत कळंबे यांच्या शुभेच्छा बॅनर्सवर ठिकठिकाणी शिक्षण व अर्थ सभापती पदाचा उल्लेख दिसून आल्याने पोलादपूर तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत आहे.
शिवसेनेच्या रसिका केणी यांच्या वाटयाला महिला व बालविकास समितीचे पद वाटयाला आले असून, राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांच्या वाटयाला समाजकल्याण समितीचे पद वाटयाला आले आहे. अन्य दोन सभापतींच्या खात्यांचे वाटप होणे बाकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या वेळेत चारही विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत कळंबे आणि शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपच्या वतीने वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीच्या वतीने नारायण डामसे यांनी आपले प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जिल्हा नियोजन सभागृहात पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरवात होताच विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांनी या चौघांचीही निवड बिनविरोध करीत असल्याचे जाहीर करीत त्यांचे अभिनंदन केले.
पिठासीन अधिकारी सुनिल थोरवे यांना निवडीच्या कामी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर पठारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांनी साह्य केले. दरम्यान, या चारही सभापतींच्या निवडीनंतर रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्व उपस्थित जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत समिती सभापती, समर्थकांनी सभागृहात गर्दी करीत निवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.
पोलादपूर तालुक्यातील देवळे जि.प.गटातून दोनवेळा तर लोहारे जि.प.गटातून दोनवेळा निवडून आलेले चंद्रकांत कळंबे देवळे गटातून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर उपाध्यक्षपदासह कृषी सभापती पद मिळाले होते तर लोहारे गटातून दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पुन्हा सभापतीपदाची संधी मिळाल्याने पोलादपूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मंत्री भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र दळवी यांनी चंद्रकांत कळंबे यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले.
सभापतीपदावर चंद्रकांत कळंबे यांच्या निवडीची घोषणा होताच उमरठ गावासह पोलादपूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून व जल्लोष साजरा करण्यात आला.
येत्या 7 एप्रिलला चंद्रकांत कळंबे आणि भाजपचे वैकुंठ पाटील यांना कोणत्या खात्यांचे सभापती होण्याची संधी मिळते याबाबत निर्णय होणार असताना चंद्रकांत कळंबे यांच्या स्वागत आणि अभिनंदनाच्या शुभेच्छा बॅनर्सवर ठिकठिकाणी शिक्षण व अर्थ सभापती पदाचा उल्लेख दिसून आल्याने खातेवाटपाचा वारू कोणी रोखला, असा सवाल चर्चेत विचारला जात आहे.