देशभर गाजलेल्या नीट (NEET) परीक्षा आंदोलनाला मिळालेल्या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी कोकण उत्तर भारतीय एकता मंच, रायगड यांच्या वतीने माणगाव येथील कार्यालयात रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी विशेष अभिनंदन व विजय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र मधुकर (राजाभाऊ) ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक विजयाचे प्रतीक म्हणून उपस्थितांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कोकण उत्तर भारतीय एकता मंचाचे अध्यक्ष ज्ञानचंद जी. जयस्वाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशाच्या लोकशाही इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. “हे आंदोलन भविष्यातील पिढ्यांना दिशा देणारे ठरले असून, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो, हे विद्यार्थ्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. त्यांच्या शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षामुळे संबंधित केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. हा विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा आणि संविधानिक मूल्यांचा विजय आहे. या ऐतिहासिक यशाचा आनंद सर्वांनी पेढे वाटून साजरा करूया आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आपला भक्कम पाठिंबा दर्शवूया,” असे ते म्हणाले.
हा कार्यक्रम रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या माणगाव व महाड दौऱ्याच्या निमित्ताने डॉ. सिंग यांनी आयोजित केला होता. स्वर्गीय माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र असलेले राजाभाऊ ठाकूर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोकण उत्तर भारतीय एकता मंचाच्या वतीने राजाभाऊ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माणगाव तालुका काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंग यांच्या शिफारशीनुसार अध्यक्ष ज्ञानचंद जयस्वाल यांनी राजाभाऊ ठाकूर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते. यावेळी जयस्वाल यांनी सर्वप्रथम राजाभाऊ ठाकूर यांना पेढा भरवून विजयाचा आनंद साजरा केला. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांना पेढे वाटण्यात आले.
या प्रसंगी मंचाचे माजी अध्यक्ष व माणगाव तालुका काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. नरेंद्र सिंग, मंचाचे वरिष्ठ सदस्य व उपाध्यक्ष शिवचरण चौधरी, ज्येष्ठ समाजसेवक व सल्लागार रामप्रकाश कुशवाहा यांच्यासह मंचाचे प्रमुख सदस्य समीर कुशवाहा, अमित गुप्ता, निलेश गुप्ता, गुड्डू गुप्ता, धर्मराज कुशवाहा, अवधेश शुक्ला, योगेंद्र विश्वकर्मा, किशन गौतम, अजय गौतम, सुभाष प्रसाद, प्रदीप जाधव, सुनील गुप्ता, मनोज शाह, संतोष गुप्ता आणि शुभम जयस्वाल तसेच इतर पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, माणगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी राजाभाऊ ठाकूर यांनी महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार व न्याय मिळाला असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेले यश आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा संविधानिक मूल्यांचा व लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या विजयाचा आनंद पेढे वाटून साजरा करत करण्यात आला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला एकजुटीचा पाठिंबा दर्शवत, संविधानिक मूल्ये, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला.