कोंदिवडे रस्त्याची चाळण; ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता?’ ‘छोट्या जेएनजी’चा एल्गार

कर्जत | गणेश पवार
कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात या रस्त्यावरील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना अचानक ब्रेक लावणे किंवा खड्डे चुकविणे भाग पडते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहनांचे टायर, चाके व अन्य भागांचेही नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच वाढतो. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने रस्त्याची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नेहा धारे, मानसी पवार, ज्योत्स्ना आदी शाळकरी विद्यार्थिनींनी कल्पकतेचा आधार घेत व्हिडिओ तयार केला आहे. ‘जेएनजी’ आंदोलनाच्या धर्तीवर या ‘छोट्या जेएनजी’ने आपल्या परीने आवाज उठवत ‘खड्डे बुजवा, रस्ता सुरक्षित करा’ असा संदेश दिला आहे. केवळ पावसाळ्यात माती अथवा खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार डागडुजी करावी, तसेच यापूर्वीच्या कामांची गुणवत्ता आणि खर्चाची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमाची नागरिकांकडून कौतुक होत असून, आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या ‘छोट्या जेएनजी’च्या इशाऱ्याची दखल घेणार का, याकडे कोंदिवडे ग्रामस्थांसह संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.