महाड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी पाट्या लावणे बंधनकारक करावे तसेच कामगारांवरील अन्याय आणि पिळवणूक तातडीने थांबवावी, अन्यथा २५ जूननंतर मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी दिला.
महाड एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्नांवरून मनसेने औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जमावबंदी आदेशाची नोटीस बजावण्यात आल्याने हा मोर्चा स्थगित करण्यात आला. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी महाड औद्योगिक वसाहतीचे कार्यकारी अभियंता उईके तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत कंपन्यांनी मराठी भाषेतील पाट्या लावाव्यात, कामगारांना कायद्यानुसार सुविधा द्याव्यात आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना राज पार्टे यांनी काही ठेकेदार आणि बाहेरील घटकांकडून औद्योगिक परिसरात दादागिरी केली जात असल्याचा आरोप केला. मनसेचे नेते गोळे यांनीही स्थानिक भूमिपुत्र कामगारांचे नुकसान होत असल्याचे सांगत, कामगारांच्या नावाखाली ठेकेदार आंदोलन करीत असल्याचा दावा केला. स्थानिक कामगारांना न्याय मिळावा आणि कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, हीच मनसेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच २५ जूनपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.