कर्जत शहरातील विविध नागरी समस्या बाबत कर्जत नगरपरिषद विरोधात कर्जत शहर बचाव समितीने सोमवार पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
गेली अनेक दिवस कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्जत नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर खऱ्या अर्थाने शहराचे पालकत्व हे पालिका म्हणजेच मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे आले.परंतु प्रशासक बसल्यापासून कर्जत शहरातील समस्यांमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. पालिका प्रशासनावर कोणाचाही अंकुश न राहिल्याने बेजबाबदार अधिकारी आणि निष्क्रिय कर्मचारी यांच्यामुळे कर्जत शहर समस्यांचे माहेर घर बनले. नागरिकांच्या तक्रारीची देखील दखल घेत नसल्याने अखेर कर्जत शहर बचाव समिती मैदानात उतरली.बचाव समिती मार्फत सोमवार पासून आमरण साखळी उपोषण सुरू झाले. आज उपोषणाचा चौथा दिवशी कर्जतच्या मुख्याधिकारी गारवे यांना जाग आल्याची चर्चा उपोषण स्थळी दिसत होती. यावेळी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आज उपोषण मध्ये हेमंत बडेकर ,शिवाजी श्रीखंडे, दिगंबर कांबळे,संदीप बोराडे, प्रमोद पिंगळे,धर्मद्र मोरे ,प्रणेश यादव ,शिवाजी श्रीखंडे आदींनी सहभाग घेतला होता. दुपारी ४.०० मुख्याधिकारी वैभव गारवे आणि पालिकेचे इतर कर्मचारी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्य संदर्भातील समस्यांबाबत गारवे यांनी आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले.
या मध्ये डास फवारणी घंटा गाडी बाबत वेळापत्रक लावण्यात येईल. सी सी टीवी कॅमेरा बाबत कार्यवाही करण्यात येईल तसेच कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्नाबाबत ॲड कैलास मोरे यांनी दोन दिवसात येथील अनधिकृत हातगाड्या बाजूला करून अधिकृत हातगाड्या यांची यादी बोर्ड वर लावण्यात यावी. शहरातील एकेरी वाहतूक कारवाई न झाल्यास हे उपोषण सुरूच राहील असे पालिका प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले. पालिका विरोधात उपोषण सुरू असताना मुख्य प्रशासक म्हणून सदर उपोषणाला भेट देण्यासाठी उशीर का लागला.यावर मिश्कीलपणे मुख्याधिकारी गारवे यांनी , “एवढं मोठं उपोषण आहे ते लोकांपर्यंत पोहचला पाहिजे” यासाठी उशीरा आल्याचे सांगितले. पालिका प्रशासक म्हणून संपूर्ण शहराची जबाबदारी असताना देखील मुख्याधिकारी असे बेताल वाक्त्यव्य करीत आहेत.
मुख्याधिकारी वैभव गारवे आणि उपोषणकर्ते यामध्या काही समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी पालिकेकडून दिले गेलेले आश्वासनाची पूर्ती दोन दिवसात दिसली नाही तर हे आमरण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख ॲड. कैलास मोरे यांनी जाहीर केले.