कर्जत तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नव्या एसटी बसेस प्रत्यक्ष कर्जत आगारात दाखल झाल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी सकाळी ११ वाजता भिसेगाव (कर्जत) येथील एसटी आगारात आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी आमदार थोरवे म्हणाले, “एसटी ही केवळ प्रवासाची नाही तर सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडलेली एक महत्त्वाची सेवा आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध, कामगार आणि वारकरी यांच्यासाठी एसटी ही जीवनरेषा आहे.” त्यांनी शासन आणि एसटी महामंडळाकडे पाठपुरावा करून अखेर पाच नवीन बस कर्जतसाठी मिळविल्या, हे या यशामागचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.
या बसेस कर्जतसह पनवेल, खोपोली, शहापूर, वाशी, तुळजापूर अशा विविध मार्गांवर धावणार असून, यामुळे प्रवाशांना नियमित आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. या उपक्रमासाठी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत शेठ गोगावले यांचे सहकार्य लाभल्याचेही आमदारांनी स्पष्ट केले.
तसेच, कर्जत एसटी आगाराच्या नूतनीकरणाची घोषणाही यावेळी करण्यात आली. “नवीन स्वच्छतागृहे, आधुनिक स्वरूपात आगाराचा विकास आणि शासनाकडून निधी मिळवून कामे हाती घेतली जातील,” असे आमदार थोरवे यांनी सांगितले.
या सोहळ्यात आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक निरीक्षक महादेव पालवे, लेखाधिकारी अंकुश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील जंगम यांनी विधिवत पूजन करून फीत कापून बसेसचे लोकार्पण केले.
कार्यक्रमानंतर आमदार थोरवे यांनी नव्या बसमध्ये प्रत्यक्ष प्रवास करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. “१५–२० वर्षांनंतर पुन्हा एकदा लालपरीत बसण्याचा अनुभव घेतला,” असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थिनी सायली भोसले हिने आमदार थोरवे यांचे कौतुक करताना सांगितले की, “डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार, विठ्ठल मूर्ती, संभाजी महाराज स्मारक या उपक्रमांमुळे कर्जतचं वैभव वाढत आहे. आमदार साहेबांच्या प्रयत्नांमुळे खऱ्या अर्थाने कर्जतचा कायापालट सुरू आहे.”