कर्जतच्या जनार्दन जाधव यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार

कर्जत- ग्रामीण | मोतीराम पादीर
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंत्राड-निड गावातील सुशिक्षित युवक जनार्दन रघुनाथ जाधव यांनी नोकरी सांभाळत साहित्य आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कविता लेखन, गाणी लेखन तसेच गायनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलनातही त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
जनार्दन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सुप्रसिद्ध गीत लेखन करून त्याचे प्रभावी गायन केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक (महाराष्ट्र) यांच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय “छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. साहित्य, संगीत आणि शिवचरित्र प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दि. २४ मार्च रोजी नाशिक येथील गंजामाळ रोटरी क्लब सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व सन्मानपदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील, तहसीलदार गणेश जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, पत्रकार जिजा दवंडे, आयटकचे राजू देसले, संस्था अध्यक्ष डॉ. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जनार्दन जाधव यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.