एसटी बस चिखलात घसरून झाडावर आदळली; नऊ प्रवासी सुखरूप

एसटी बस चिखलात घसरून झाडावर आदळली
रायगड | अमुलकुमार जैन 
महाड आगाराची पाने-वाघोली मार्गे महाडकडे येणारी एसटी बस वाघोली गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात घसरून झाडावर आदळली. बसमध्ये नऊ प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती महाड आगाराकडून देण्यात आली.
महाड आगाराची एमएच २० बीएल ३४६७ क्रमांकाची बस चालक नानासाहेब दगडू कांबळे चालवत होते. वाघोलीजवळील अरुंद व खराब रस्त्यावर बसचे चाक रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलात घसरले. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला जाऊन रुतली आणि पुढे घसरत जाऊन झाडावर आदळली. अपघातामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली.
अपघाताची माहिती मिळताच एसटी प्रशासनाने मदतकार्य सुरू केले. आगारप्रमुख रितेश फुलपगारे यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. वाहतूक निरीक्षक उदय हॉटेल यांच्या मार्गदर्शनाखाली एसटीच्या ट्रकच्या सहाय्याने व रोपच्या मदतीने अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात आली. पावसाळ्यात ग्रामीण भागातील अरुंद व चिखलमय रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने वाघोलीजवळील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून प्रवासी वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.