राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र “एकल महिला धोरण” तयार करीत आहे. या धोरणाला अधिक व्यापक, लोकाभिमुख आणि परिणामकारक स्वरूप देण्यासाठी रायगड जिल्ह्यात १८ जून २०२६ रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथील राजस्व सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषयतज्ज्ञ यांच्याकडून सूचना व अभिप्राय स्वीकारले जाणार आहेत. शासनाच्या धोरणनिर्मितीत नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
रोजगाराच्या संधी, मालमत्ता हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील सुधारणा, नव्या योजनांविषयी अपेक्षा, कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा, महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक सहभाग वाढविण्याबाबतच्या सूचना लिखित स्वरूपात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. कार्यशाळेदरम्यान प्राप्त होणाऱ्या अभिप्रायांचा एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करताना विचार केला जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी सांगितले असून, सर्व संबंधितांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.