उरण तालुक्यातील द्रोणागिरी रेल्वे स्टेशनजवळ दिनांक २४ मे २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोशल मीडियावर तात्काळ व्हायरल झाली असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, सदर मृतदेह उरण तालुक्यातील बोकडविरा येथील सर्जेराव शेलार (वय अंदाजे ६०) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
ही आत्महत्या होती की घातपात, याबाबत अधिक तपास उरण पोलीस आणि रेल्वे पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, सर्जेराव शेलार यांचा मृत्यू उरणहून बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली आल्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेने उरण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी शेलार कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची अपेक्षा आहे.