उरण: कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर; शिवसेनेचा संतप्त आक्रोश

Uran koproli phc
उरण (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी १२ जून २०२५ रोजी अचानक भेट देऊन आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ४ डॉक्टरांची नेमणूक असताना, त्या दिवशी दिवसभरात तब्बल ९२ रुग्णांनी उपचारासाठी भेट दिली, तरीही एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर, पदाधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांना याबाबत जाब विचारला असता, डॉक्टर अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेपूर्वी देखील २० दिवसांपूर्वी डॉक्टर नसल्याबाबत तक्रार जिल्हा वैद्यकीय अधिकारी, अलिबाग यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून नवीन मशिनरी तसेच हायटेक ऑपरेशन थिएटर तयार करायचं आहे, अशी माहिती अधिकृतस्तरावरून मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरु असल्याचे दृश्य नव्हते.
डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचारी नियमित अनुपस्थित असल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. पारदर्शक कारभार नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून सदर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या गैरसोयीमुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि शासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे एखादा निरपराध प्राण गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 यावेळी शेवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी सभापती विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे , माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील , कोप्रोली शाखा प्रमुख रवींद्र म्हात्रे,  पर्जन्य म्हात्रे , सामाजिक कार्यकर्ते नंदन म्हात्रे , कोळीवाडा अध्यक्ष महेश कोळी , सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसैनिक धनेश म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *