भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीपूर्वीचे महिन्यांचे कॅलेंडर उत्सवांनी भरलेले आहे.
गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव, दीपावली यांसारखे मोठे सण ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान येत असल्याने, हे सण साजरे करणाऱ्या सार्वजनिक आणि सामाजिक मंडळांना या वर्षी वर्गणीसाठी दारोदारी फिरावे लागणार नाही, अशी शक्यता आहे. निवडणूकपूर्व वातावरणात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळेल, अशी आशा सर्वत्र आहे.
राजकीय पक्षांचे लक्ष सध्या मतदारांवर केंद्रित आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वर्गणीसाठी अधिक धावपळ करावी लागणार नाही. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील अनेक मंडळे आणि संस्था सण साजरे करतात आणि हे उत्सव म्हणजे स्थानिक पातळीवर सामाजिक एकजूट साधणारे महत्त्वाचे कार्यक्रम असतात.
राज्य निवडणूक आयोगाने अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ११ जून ते १ सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना प्रकाशित होणार असून त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे नवी मुंबईसह इतर महापालिकांची निवडणूक नोव्हेंबरपर्यंत होणार असल्याची शक्यता आहे.