आंबेवाडी–वरसगांव नाक्यावर नागरिकांचे दुसऱ्या दिवशीही साखळी उपोषण सुरू; शिंदे शिवसेनेचा ठाम पाठिंबा – प्रमोद घोसाळकर

Ambewadinaka sakhali uposhan & vonod ghosalkar

कोलाड | श्याम लोखंडे

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी कोलाड–वरसगांव येथील नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले साखळी उपोषण योग्य व रास्त असल्याचे मत रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केले. या महामार्गावरील पुलाला १७ वर्षे पूर्ण होऊनही स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या जिवावर मोठे नेते पुढे गेले, मात्र आज कोलाडवासीयांचा विसर पडल्याची टीका त्यांनी केली.

घोसाळकर म्हणाले की, आंबेवाडी–वरसगांव नाका हे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असून विविध भागांतील नागरिकांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र अंडरपास बोगदा नसल्यामुळे नागरिकांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून वळसा घालावा लागत आहे. तसेच सर्व्हिस रोडचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. गटारांवर झाकणे नसल्यामुळे मनुष्यहानी व जनावरांची हानी होत असल्याने या मागण्या अत्यंत रास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जोपर्यंत शासन आंबेवाडी येथील स्थानिक नागरिकांच्या मागण्या पूर्ण करीत नाही, तोपर्यंत शिंदे शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा निर्धार प्रमोद घोसाळकर यांनी व्यक्त केला.

आंबेवाडी बाजारपेठेतील द.ग. तटकरे चौकात दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली. यावेळी माजी सरपंच सुरेशशेठ महाबळे, चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, संजय कुर्ले, चंद्रकांत जाधव, विजय बोरकर, उदय खामकर, विष्णु महाबळे तसेच असंख्य व्यापारी व कोलाड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *