आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; आठ बळींनंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष?

रायगड | अमूलकुमार जैन
महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत असताना आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आठ युवकांचा बळी घेणाऱ्या भीषण दुर्घटनेनंतरही सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पर्यटकांच्या जीविताची हमी कोण देणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली असून मेटतळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महाबळेश्वर ते प्रतापगडदरम्यान अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेले असून, रिफ्लेक्टर आणि धोक्याचे इशारा फलकही अपुरे असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून कठड्यांची दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. आणखी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे व्हावे, अशी अपेक्षा पर्यटक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.