आज सकाळपासून रेवदंडा व अलिबाग परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. प्रचंड विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. याचदरम्यान बगमळा परिसरात विजेचा थरारक प्रकार घडला असून पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या उंच ताडाच्या झाडावर अचानक वीज कोसळून झाडाला आग लागल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बगमळ्याजवळील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे उभ्या असलेल्या ताडाच्या झाडावर जोरदार विज कोसळली. काही क्षणांतच झाडाने पेट घेतला आणि आकाशात ठिणग्यांचा वर्षाव होत असल्याचे थरारक दृश्य परिसरातील नागरिकांनी पाहिले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही झाडाला लागलेली आग काही काळ धगधगत राहिली, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या अगदी जवळच CNG व पेट्रोल पंप असल्याने संभाव्य मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे काही काळ परिसरात घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने आग पसरली नाही आणि कोणतीही मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून अवकाळी पावसासह विजांचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.